गावदेवी भाजी मंडईतील आग विझवताना बलिदान; मृत अग्निशमन जवानांना शहिदांचा दर्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावदेवी भाजी मंडईच्या अग्नितांडवात वीरमरण आलेले ठाणे पालिकेच्या सुरक्षा विभागाचे आरक्षक काळू गाडेकर आणि अग्निशमन विभागाचे केंद्र अधिकारी सागर शिंदे यांना शहीद दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. तसेच या जवानांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देणार असून मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील घेण्यात येणार आहे.

ठाणे पालिकेच्या महासभेत गावदेवी आगीच्या दुर्घटनेबाबत पाच लक्षवेधी मांडण्यात आल्या. यावर तब्बल ८ तासांची प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यानिमित्ताने गावदेवी मंडईतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या. अग्निशमन दलातील रिक्त पदे तातडीने भरणे, शहरातील सर्व इमारतींचे फायर ऑडिट करणे आणि दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अनेक नगरसेवकांनी केली. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान नगरसेवक भरत चव्हाण, संजय वाघुले, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, नजीब मुल्ला आदींसह ३० हून अधिक नगरसेवकांनी सहभाग घेतला.

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
गावदेवी मंडईतील बेकायदा गाळे, व्यवसायातील बदल आणि स्थावर मालमत्ता विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजी मंडईसाठी मंजूर झालेल्या गाळ्यांमध्ये कपड्यांचा व्यवसाय सुरू होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी अनेक नगरसेवकांनी केली.

दोन नगरसेवकांचे मानधन कुटुंबीयांना
सभागृह नेते हणमंत जगदाळे आणि अजित पवार गटाचे नगरसेवक नजीब मुल्ला हे आपले नगरसेवक पदाचे पाच वर्षांचे मानधन मृतांच्या कुटुंबीयांना देणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी गंभीर मुद्याला हात घालत ज्या सभागृहात ही चर्चा करत आहोत त्या ठिकाणीच अग्निशमनची यंत्रणा नसल्याचे धक्कादायक वास्तव मांडले.