Ratnagiri News – मुकुल माधव विद्यालयात वार्षिक आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुकुल माधव फाऊंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुकुल माधव विद्यालयात 18वे वार्षिक सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी 2008 पासून सातत्याने राबविण्यात येत असलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या निरोगी भविष्यासाठी मोलाचे योगदान देत आहे.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक (तांत्रिक) रामबाबू सांका, फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे तसेच आशिष आठवले उपस्थित होते. शिबिरामध्ये पुणे व रत्नागिरी येथील अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी केली. यामध्ये पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयाचे 5 डॉक्टर, सिंबायोसिस मेडिकल कॉलेजचे 6 डॉक्टर, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ पथक, इन्फिगो आय हॉस्पिटलचे दोन नेत्ररोगतज्ज्ञ, रत्नागिरी येथील देशपांडे डेंटल हॉस्पिटल व श्री डेंटल क्लिनिकचे दंतचिकित्सक तसेच पारकर हॉस्पिटलचे डॉक्टर सहभागी झाले होते. याशिवाय बालरोग, कान-नाक-घसा (ईएनटी), नेत्ररोग, त्वचारोग, दंतचिकित्सा आणि स्त्रीरोग या विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले.

शिबिराच्या पहिल्याच दिवशी मुकुल माधव विद्यालयातील 458 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दृष्टी तपासणी, दंत तपासणी आणि विविध वैद्यकीय चाचण्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, 22 ते 27 जून या कालावधीत हा उपक्रम पावस परिसरातील 15 शाळांमध्ये राबविण्यात येणार असून एकूण 2,562 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. दरवर्षी या उपक्रमाद्वारे पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन व पाठपुरावा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

हा उपक्रम केवळ आरोग्य तपासणीपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. तसेच पालकांमध्ये मुलांच्या आरोग्याची नियमित काळजी, योग्य आहार आणि वेळेवर वैद्यकीय तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सर्व वैद्यकीय सेवा व तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमादरम्यान सहभागी डॉक्टर व आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचा त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचे डॉ. अनुप करमरकर, वरद गोरे, शामराव निंबाळकर आणि यास्मिन यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाचे प्राचार्य रोहित देशपांडे यांनी उपस्थित डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, मुकुल माधव फाऊंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, स्वयंसेवक आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.