
नवख्या काबो व्हर्डे संघाने जिगबाज खेळ करत बलाढ्य समजल्या जाणाऱया उरुग्वेला रोखण्याचा पराक्रम केला. यापूर्वी त्यांनी आपल्या सलामीच्या सामन्यातही स्पेनला बरोबरीत रोखले होते. त्यानंतर आता उरुग्वेच्या संघालाही त्यांनी वेठीस धरले होते. विश्वचषकात प्रथमच सहभागी झालेल्या या संघाने मियामी स्टेडियमवर दोन वेळच्या विजेत्या उरुग्वेविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली. या सलग दुसऱया बरोबरीमुळे काबो वर्डेने स्पर्धेतील आपला दुसरा गुण मिळवला आणि बाद फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवले.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच काबो वर्डेने वर्चस्व गाजवले. सर्वांना आश्चर्यचकित करत त्यांनी 21 व्या मिनिटाला उरुग्वेविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली. तेलमो अर्कांजोच्या फ्री किकचे केविन पिनाने एका शानदार गोलमध्ये रूपांतर केले, जो विश्वचषक इतिहासातील काबो वर्डेचा पहिला गोल ठरला. पण उरुग्वेने काबो वर्डेला ही आघाडी जास्त काळ टिकू दिली नाही आणि मध्यंतराच्या अगदी काही मिनिटांपूर्वीच 1-1 अशी बरोबरी साधली. मॅक्सी अराउजोने उरुग्वेचा सामन्यातील पहिला गोल केला. रॉड्रिगो बेंटानकुरचा हेडर पोस्टला लागून परत आला, ज्यावर अराउजोने एका उत्कृष्ट शॉटने गोल केला. त्यानंतर उरुग्वेने स्टॉपेज टाइममध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. ऑगस्टिन कानोबियोने संघाचा दुसरा गोल केला.
दुसऱया गोलनंतर उरुग्वे हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते आणि संघाने काबो व्हर्डेच्या बचावावर दबाव कायम ठेवला. पिछाडीवर पडलेल्या काबो वर्डेने 57 व्या मिनिटाला आपला स्टार खेळाडू हेलिओ वारेला मैदानात उतरवले. मैदानात येताच वारेलाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले आणि 60 व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. उरुग्वेकडून पास देण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऑलिव्हेराने चेंडू थेट वारेलाकडे दिला. वारेलाने याचा पुरेपूर फायदा घेतला आणि गोलरक्षकाला चकवून एक शानदार गोल केला. यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु त्यापैकी एकालाही यश आले नाही आणि सामना 2-2 असा बरोबरीत संपला.

























































