कन्नमवार, टागोर नगरातील जलवाहिन्यांसाठी तातडीने निधी द्या, सुनील राऊत यांची विधानसभेत मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विक्रोळीतील कन्नमवार नगर आणि टागोर नगरातील जलवाहिन्या आणि मलनिःसारण वाहिन्यांसाठी म्हाडाने महानगरपालिकेला देय असलेला निधी तातडीने देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी आज विधानसभेत केली.

सुनील राऊत यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे हा प्रश्न विधानसभेत मांडला. कन्नमवार आणि टागोर नगर येथे म्हाडाच्या वसाहती आहेत. तेथील जलवाहिन्या आणि मलनिःसारण वाहिन्या म्हाडाने टाकल्या होत्या. त्यानंतर त्या महानगरपालिकेकडे हस्तांतरीत केल्या होत्या.

कन्नमवार नगर येथील मलनिःसारण वाहिनीचे उन्नतीकरण करण्यासाठी 29 कोटी तर टागोरमधील मलनिःसारण वाहिनीसाठी 85 कोटी रुपये तसेच या दोन्ही वसाहतींमधील जलवाहिन्यांच्या उन्नतीकरणासाठी 43 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महानगरपालिकेने तयार केले आहे. त्यातील 50 टक्के रक्कम म्हाडाने अदा केल्यानंतरच कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात येईल असे महानगरपालिकेने म्हाडाला कळवले आहे.

म्हाडाने अद्याप तो निधी महानगरपालिकेला दिलेला नाही. त्यामुळे कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शासनाने म्हाडाला तसे निर्देश तातडीने द्यावेत, अशी मागणी सुनील राऊत यांनी केली.