फुटीने आकडे बदलतात निष्ठा नाही! उद्धव ठाकरे यांचा उद्यापासून झंझावाती दौरा; यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी, धाराशीव, शिर्डीत मतदारांशी संवाद साधणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवार, 27 जूनपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी शहर, धाराशीव शहर आणि शिर्डी येथे मतदारांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेशी बेइमानी करणाऱ्या फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती सभादेखील होणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून गद्दारांचा हिशेब चुकता करणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. ‘फुटीने आकडे बदलतात, निष्ठा नाही…’ असा संदेशच या दौऱ्यातून दिला जाणार आहे.

सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने देशभरात सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून विरोधी पक्षांचे खासदार-आमदार फोडले जात आहेत. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रात फोडाफोडी झाली. शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले सहा खासदार शिंदे गटात गेले. या गद्दारीविरोधात राज्यात प्रचंड जनक्षोभ असून मतदार कमालीचे खवळले आहेत. संतप्त मतदारांच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे थेट मतदारसंघात जात आहेत. नुकताच त्यांनी ईशान्य मुंबईतील गद्दार खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी झालेल्या त्यांच्या सभेला तुफान प्रतिसाद मिळाला. उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवसैनिक व स्थानिक जनतेची गर्दी उसळली होती. गद्दारीविरोधात जनतेमध्ये असलेला राग यावेळी दिसला होता. तेच वातावरण सध्या सर्वत्र आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते नेमके काय बोलतात, गद्दारांचा कसा समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा असेल दौरा

जून 27

  • सकाळी 10.30 वा. ः कृषी उत्पन्न बाजार समिती, धामणगाव रोड, यवतमाळ
  • दु. 2.00 वा. ः जैन भवन, अकोला नाका, वाशीम
  • सायं. 4.00 वा. ः महावीर भवन, रामलीला मैदानजवळ, हिंगोली.

जून 28

  • सकाळी 11 वा. ः  अक्षदा मंगल कार्यालय, एम. के. व्ही. रोड, परभणी
  • दुपारी 3.30 वा. ः सिद्धाई मंगल कार्यालय, धाराशीव.

जून 29

सकाळी 11 वा. ः सिद्ध संकल्प लॉन्स, नगर-मनमाड हायवे साकुरी-शिर्डी, राहता, अहिल्यानगर.