आई आहे की वैरीण; शाळेत रडते म्हणून पोटच्या पोरीला लाथेने तुडवले, पनवेलच्या नांदगाव अंगणवाडी शाळेतील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंगणवाडी जाणारी अडीच वर्षाची चिमुकली शाळेत रडते म्हणून तिच्या आईने रागाच्या भरात शाळेच्या दरवाजातच पोटच्या पोरीला लाथेने तुडवल्याची संतापजनक घटना पनवेल तालुक्यातील नांदगाव परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱयांनी ही आई आहे की वैरीण असा संताप व्यक्त केला.

अंगणवाडीत गेल्या सहा दिवसापासून ही अडीच वर्षाची चिमुरडी जात होती. पण तिचे मन लागत नव्हते त्यामुळे ती सतत रडत होती. नेहमीप्रमाणे तीची आई तिला शाळेत सोडण्यास गेली असताना ती रडायला लागली, घरी घेऊन चल म्हणून आईच्या मागे लागली. त्यामुळे संतापलेल्या आईने अंगणवाडीच्या दरवाजातच तिला लाथेने तुडवले. लाथेच्या प्रहरामुळे ती चिमुकली पायरीवरून खाली पडली. हा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर व सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याची दखल पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली व तातडीने त्या मुलीच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात आणून त्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

बालकल्याण समितीसमोर हजर

या चिमुकलीच्या आईला पोलिसांनी नोटीस बजावली तसेच त्या चिमुकलीला तिच्या आईसह शासनाच्या बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे. मुलगी रडते तर तिला चापट मारणे समजू शकतो पण अमानुषपणे लाथेने तुडवणे योग्य आहे का असा संताप पालकांनी व्यक्त केला.