
निवडणूकपूर्व कामासाठी शिक्षकांच्या पूर्णवेळ सेवा घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष, आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी पालिका आयुक्त तथा प्रमुख निवडणूक अधिकारी, मुंबई अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे. शिक्षक BLO (किंवा निवडणूक) कार्यात गुंतवल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनेक खासगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या नियुक्त्या मोठ्या प्रमाणात बीएलओ (BLO) पदावर केल्या असून त्यांना निवडणूक अंतर्गत करावयाच्या कामाकरिता शाळेत न जाता पूर्णवेळ मतदार याद्या दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय काही शाळांतील बहुसंख्य शिक्षकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. बोरिवलीतील सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथील ७१ पैकी ५० शिक्षकांच्या सेवा अधिग्रहीत केल्या असून दहिसर पूर्व येथील प्रज्ञा विद्यालयाच्या ३७ पैकी ३४ शिक्षकांच्या, तर घाटकोपर पूर्वच्या विद्याभवन हायस्कूल येथील ४० पैकी ३१ शिक्षकांच्या सेवा अधिग्रहीत केल्या आहेत. अशा अनेक शाळांसंदर्भात आदेश देण्यात आले आहेत, याकडे ज. मो. अभ्यंकर यांनी लक्ष वेधले.
शिक्षकांविरोधातील गुन्हे मागे घ्या
शिक्षकास निवडणूकपूर्व कामाची सक्ती करता येणार नाही; नकार देणाऱ्या शिक्षकांविरुद्ध कोणतीही कारवाई करता येणार नाही आणि काम स्वीकारणाऱ्या शिक्षकास सुट्टीच्या दिवशी अथवा शाळा संपल्यानंतर मिळणाऱ्या फावल्या वेळेत सदरचे काम देता येईल, असा या सर्व न्यायिक निर्णयाचा सार आहे. शिक्षकांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेले गुन्हे परत घेण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि शिक्षकांच्या इच्छेविरुद्ध शालेय कार्य सुरू असतानाच्या काळात त्यांच्या सेवा निवडणूकपूर्व कार्याकरिता घेऊ नयेत, अशी मागणी अभ्यंकर यांनी केली.



























































