
बॉलीवूड अभिनेता सलमान खान आता वांद्रे परिसरातच नवीन बंगला बांधणार आहे. 16 जूनला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने वांद्रे येथील चिंबई परिसरात या सहा मजली सी-फेसिंग निवासी इमारत बांधण्यास मंजुरी दिली आहे, परंतु सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून कुटुंबीयांसह नवीन घरात शिफ्ट होणार का, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
सलमान खानने खरेदी केलेला हा नवीन भूखंड गॅलेक्सी अपार्टमेंटपासून अवघ्या काही अंतरावर आहे. हा भूखंड सलमानची आई सलमा खान यांच्या नावावर आहे. यापूर्वी या जागेवर 1956 पूर्वी बांधलेले दुमजली घर होते. ही जमीन यापूर्वी मेरी क्लोटिल्डा बॅप्टिस्टा यांच्या नावावर होती. नंतर अनेक वेळा मालक बदलले आणि 2011 मध्ये खान कुटुंबाने ती विकत घेतली. इमारत जीर्ण झाल्यामुळे ती पाडण्यात आली होती. आता या भूखंडावर तळमजला, स्टिल्ट आणि सहा मजली निवासी इमारत बांधली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सलमानचे कुटुंब 1974 पासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे. ईद, दिवाळी आणि सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याचे हजारो चाहते गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर जमतात आणि सलमान बाल्कनीतून त्यांचे अभिवादन करतो. 2024 मध्ये दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी या इमारतीवर चार गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर फ्लॅटची बाल्कनी बुलेटप्रूफ काचेने झाकण्यात आली होती.



























































