
सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री उत्तर भागात पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एक मोठा पूल वाहून गेला. या घटनेनंतर, फिडांग आणि सांकलांग यांना जोडणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. पूल कोसळल्याने परिसरातील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, तर रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शनिवारी रात्री उत्तर सिक्कीमच्या झोंगू परिसरात मुसळधार पाऊस झाला. यादरम्यान, फिडांगमधील फी खोला नदीची पाणी पातळी अचानक वाढली. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की तेथील बेली ब्रिज वाहून गेला. पूल कोसळल्याने फिडांग-सांकलांग रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. हा रस्ता संपूर्ण परिसराच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रस्ता बंद झाल्याने अनेक जवळच्या गावांशी संपर्क तुटला आहे. स्थानिकांना आता अत्यावश्यक कामांसाठीही पलीकडे जाणे शक्य होत नाही.
हवामान खात्याने सिक्कीमसह संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला होता. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार हवामान खात्याने या आठवड्यात अनेक भागांमध्ये ७ ते २० सेंटीमीटर पावसाचा अंदाज वर्तवला होता. सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये 29 जूनपर्यंत अतिवृष्टीचा अंदाजही वर्तवण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच, मंगन येथील स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बाधित भागाची व परिस्थितीची पाहणी केली. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, दक्षिण सिक्कीममधील लिंगी परिसरातूनही सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वृत्त समोर आले आहे.
सततच्या पावसामुळे प्रशासनाने जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने या खराब हवामानात कोणत्याही तातडीच्या कामाशिवाय प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. अचानक येणारे पूर, पाणी साचणे आणि भूस्खलनाच्या शक्यतेमुळे नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
























































