
युरोपमध्ये या वर्षी उष्णतेच्या भीषण लाटेमुळे नागरिक हैराण झाले असून, एकट्या फ्रान्समध्ये गेल्या ४ दिवसांमध्ये एक हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे. २४ जून ते २७ जून या कालावधीत हे मृत्यू झाल्याचे फ्रान्सच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत उष्णतेमुळे यंदा सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
युरोपमध्ये रविवारी ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदविण्यात आले. कायम बर्फवृष्टी आणि थंड वातावरणाची सवय असलेल्या युरोपमधील १९ कोटी लोकसंख्येला एवढे तापमान असह्य झाले आहे. युरोपमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवरील डांबर वितळत आहे, तर काही ठिकाणी जंगलांमध्ये आगी लागल्या आहेत. अनेक देशांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. युरोपचे तापमान जगाच्या सरासरी तापमानाच्या तुलनेत जास्त वेगाने वाढत असून, अशा प्रकारच्या उष्णतेच्या लाटा युरोपमध्ये वाढतील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
इटलीत ‘रेड अलर्ट’
ब्रिटनमध्ये काही ठिकाणी ३६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. गेल्या ५० वर्षांमधील हे विक्रमी तापमान आहे. स्पेनमध्ये अँडुजार (Endujar) शहरात तर तब्बल ४५.१ अंश सेल्सिअसवर पारा पोहोचला. प्रचंड उष्णतेमुळे गेल्या ४ दिवसांमध्ये स्पेनमध्ये २०० जणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीमध्ये ४१.५ अंश सेल्सिअस एवढे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ड्रव्हिट्ज शहरात नोंदवण्यात आले.
इटलीमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, तेथील सर्वात लांब ‘पो’ नदीची पाणी पातळी वेगाने घटत आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. डेन्मार्कसारख्या थंड देशात पारा ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचला. प्रचंड तापमानामुळे युरोपमध्ये विजेची मागणी दुपटीने वाढली आहे.
फ्रान्समध्ये उष्णतेचा कहर
पिसोस शहरात ४४.३ अंश सेल्सिअस एवढे उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले. फ्रान्सच्या बहुतांश भागात पारा ४० अंशांच्या वर होता. प्रचंड उष्णतेमुळे रेल्वेच्या रुळांना तडे गेले, तर काही ठिकाणी रूळ प्रसरण पावले. त्यामुळे रेल्वे थांबवण्याची वेळ आली. उष्णतेमुळे अणुऊर्जा केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वीजपुरवठा कमी झाला असून, ५० हजारांपेक्षा जास्त घरांमध्ये वीज नाही. स्वित्झर्लंड, पोलंड, चेक रिपब्लिक या देशांमध्ये जून महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.


























































