
एआयमुळे नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, असा गाजावाजा सध्या होत आहे. एआयवर फोकस करण्यासाठी अनेक कंपन्या कर्मचारी कपातसुद्धा करत आहेत. परंतु फोर्ड या कंपनीला एआयचा चांगला अनुभव आला नाही. एआय आणि ऑटोमेशन गुणवत्ता प्रणाली अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू न शकल्याने, उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी फोर्डने आपल्या माजी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यास सुरुवात केली आहे.
ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी अमेरिकन वाहन उत्पादक कंपनी फोर्डने गेल्या तीन वर्षांत जवळपास 350 अनुभवी इंजिनीअर्सना पुन्हा सेवेत घेतले आहे. यामध्ये कंपनीचे माजी कर्मचारी आणि पुरवठादार कंपन्यांमधील तज्ञांचादेखील समावेश आहे. फोर्ड कंपनीच्या अधिकाऱयांनी कबुली दिली की, त्यांनी अनेक दशकांपासून मिळवलेल्या अभियांत्रिकी अनुभवाच्या मूल्याकडे दुर्लक्ष करून ऑटोमेशनवर खूप जास्त अवलंबून राहणे पसंत केले होते. फोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार गल्होत्रा म्हणाले की, कंपनी ऑटोमेशनवर अधिकाधिक अवलंबून राहिली, त्यामुळे कंपनीची कामगिरी निराशाजनक झाली.
‘ग्रे बियर्ड इंजिनीअर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱया 350 अनुभवी इंजिनीअर्सना पुन्हा कामावर घेतले आहे. हे इंजिनीअर्स तरुण कर्मचाऱयांना मार्गदर्शन करतात, एआय टूल्सना पुन्हा प्रशिक्षित करण्यास मदत करतात आणि उत्पादन अंतिम टप्प्यात पोहोचण्यापूर्वीच गुणवत्तेतील समस्या ओळखतात, असे कुमार गल्होत्रा यांनी सांगितले.




























































