
रंगभूमीच्या युगप्रवर्तक, ज्येष्ठ – श्रेष्ठ नाटय़ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील मार्गदर्शक आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व हरपले! विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज बाणगंगा येथील स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आयुष्याच्या अखेरपर्यंत नाटय़चळवळीचा ध्यास घेऊन जगणारा विजयाबाई नावाचा झंझावात शांत झाला. एक नाटय़पर्व संपले!
कडक शिस्तीच्या विजयाबाईंच्या तालमीत अनेक कलाकार घडले. बाई म्हणजे चालतेबोलते नाटय़ विद्यापीठ होते. या विद्यापीठात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी बाईंना अखेरचा निरोप दिला. यावेळी अनेकांना भावना अनावर झाल्या. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, डॉली ठकोर, नसिरुद्दीन शाह, नीना कुलकर्णी, विजय पेंकरे, अजित भुरे, अमृता सुभाष आदींनी विजयाबाईंचे अंतिम दर्शन घेतले. वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव नेण्यात आले. कुटुंबीय आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.





























































