
दापोली तालुक्यातील आंजर्ले बिरवाडी येथील श्री . कालभैरव मंदिराच्या बाजूस असलेल्या ओहोळामध्ये रात्री मगरीचे पिल्लू आढळून आले. स्थानिकांनी लगेच सर्प मित्र व वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर दापोली या संस्थेचे सदस्य आणि आंजर्ले ताडाचा कोंड येथील प्रतीक बाईत, मनीत बाईत व आंजर्ले चिखलतळे येथील प्रफुल मिसाळ यांना संपर्क साधला. यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी जितेंद्र गुजले , वनपाल श्री रामदास खोत श्री प्रभू साबणे आणि शुभांगी गुरव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी जाऊन मगरीच्या पिल्लाला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित पकडून ताडील वनरक्षक शुभांगी गुरव व कोंगळा वनरक्षक प्रभू साबणे यांच्या ताब्यात दिले.
आंजर्ले बिरवाडी परिसरात कोणतेही मोठे धरण किंवा मुक्त संचार करण्यासाठीच्या वावराची सुरक्षित जागा नसतानाही सदर मगरीचे पिल्लू आले कुठून असा ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. तरी येथील सजग रहिवाशांच्या जागृततेमुळे आणि वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने तत्काळ वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर टीमने मगरीच्या पिल्लाला पकडले या महत्त्वपूर्ण कामगीरीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




























































