
लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या एकमेव महिला कसोटी क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानने इंग्लंडवर पूर्ण वर्चस्व गाजवले आहे. हिंदुस्थानने ८६.३ षटकांत ७ बाद ३४१ धावांवर आपला दुसरा डाव घोषित करून यजमान संघाला विजयासाठी ४५७ धावांचे कठीण आव्हान दिले. या डावात यास्तिका भाटिया हिने ११३ धावांची दमदार खेळी साकारत इतिहास रचला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर कसोटी शतक झळकवणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.
हिंदुस्थानी महिलांनी २८५ धावसंख्या उभारल्यानंतर इंग्लंडला १७० धावांवर रोखून पहिल्या डावात ११५ धावांची मोठी
आघाडी मिळविली होती. त्यानंतर हिंदुस्थानने दुसऱ्या दिवसाच्या १ बाद १५४ धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली. स्मृती मानधना (७०), जेमिमा रॉड्रिग्ज (३) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (१६) ही आघाडीची फळी बाद झाल्यानंतर यास्तिकाने डावाची धुरा सांभाळली. तिने अवघ्या १४५ चेंडूंत आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. १५८ चेंडूंच्या तिच्या शानदार खेळीत १४ चौकारांचा समावेश होता.
दुसऱ्या डावात तिने स्मृती मानधनासोबत ७३, तर दीप्ती शर्मासोबत ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत हिंदुस्थानचा डाव भक्कम केला. यास्तिका ११३ धावांवर सोफी एक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर दीप्ती शर्मा (१०) आणि स्नेह राणा (१) यांनाही माघारी परतावे लागले. त्यानंतर रिचा घोष ५०, तर सायली सातघरे १८ धावांवर नाबाद असताना हिंदुस्थानन आपला डाव घोषित केला.






























































