
मोबाईलवरील पब्जी गेम हरल्यानंतर केलेल्या चेष्टा, मस्करीतून संतापाच्या भरात एका अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात घडली आहे. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्या छाती, पोटावर व हातावर जबरदस्त वार करण्यात आले आहेत. जखमी मुलाला लोकमान्य रुग्णालयात दाखल केले आहे. तर हल्ल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाल्मिकीपाडा गार्डनमध्ये तक्रारदार आणि त्याचे समवयस्क काही मित्र शुक्रवारी मोबाईलवर पब्जी खेळत होते. खेळात पराभूत झालेल्या एका मित्राची नेहमीप्रमाणे चेष्टा करण्यात आली. त्यानंतर त्याच्या मित्राने संतापून चाकू आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नातेवाईकांनी त्याला समजावून घरी नेल्याने प्रकार शांत झाला. १२ जुलै रोजी रात्री सुमारे १० वाजता रामनगर येथील रबर कंपनीजवळ तक्रारदार मुलगा त्याच्या मित्रांसोबत उभा होता. चेष्टा केलेला मुलगा इतर दोघेजण एकाच दुचाकीवरून तेथे आले. त्यापैकी दोघांनी तक्रारदारावर अचानक चाकूने हल्ला केला.
हल्ल्यानंतर ते तिघे घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत तक्रारदाराने घरी धाव घेतल्यानंतर कुटुंबीय व स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.





























































