
पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमध्ये प्रवाशाची धारदार सुऱ्याने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता मध्ये रेल्वेतही लोकलमध्ये प्रवाशांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. सीएसएमटी अंबरनाथ लोकलमध्ये तीन प्रवाशांमध्ये झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने दोघांवर हातातील कड्याने वार केला. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. राजू वाघे साहिल खंदारे अशी त्या दोघांची नावे आहेत. तर प्रितेश कनोजिया असे हल्लेखोराचे नाव आहे.
ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर मध्यरात्री 12 च्या सुमारास मुंबईहून अंबरनाथला जाणाऱ्या लोकलमध्ये काही प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यानंतर प्रितेशने त्याच्या हातातील कड्याने इतर दोघांवर हल्ला केला. यात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



























































