पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र उद्याने उभारा, पालिकेत शिवसेनेची ठरावाची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र उद्याने उभारा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू महासभेत ठरावाची सूचना मांडणार आहेत. याबाबत त्यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र दिले आहे.

मुंबईची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण पाहता नागरिकांकडे पाळीव प्राणी फिरवण्यासाठी कोणतेही उद्यान किंवा मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे प्राणीप्रेमी नागरिकांमध्ये सातत्याने असंतोष वाढत आहे. महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीच्या पुस्तकात सद्यस्थितीला पाळीव प्राण्यांच्या उद्यानासाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मुंबई शहरात विविध ठिकाणी पाळीव प्राण्यांसाठी आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त नवीन उद्यानांची निर्मिती करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ठाम मत अंकित प्रभू यांनी व्यक्त केले आहे.

सविस्तर अहवाल सादर करा

या प्रस्तावाची मुंबईत तातडीने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कायदेशीर व तांत्रिक व्यवहार्यता तपासून सविस्तर अहवाल सादर करावा, अशी विनंती नगरसेवक अंकित प्रभू यांनी महापौरांना पाठवलेल्या अधिकृत पत्रात महापालिका आयुक्तांना केली आहे. तसेच सदर ठरावाची सूचना अंतिम निकाली लागेपर्यंत ती महानगरपालिकेच्या मुख्य कार्यक्रम पत्रिकेवर समाविष्ट करून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.