
<< स्पायडरमॅन
तुमच्या घरातील स्मार्ट टीव्ही किंवा अँड्रॉईड टीव्ही बॉक्स सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात असू शकतो, असे कोणी सांगितले तर? धक्कादायक वाटत असले, तरी नुकत्याच उघडकीस आलेल्या एका मोठ्या सायबर प्रकरणाने हे वास्तव समोर आणले आहे. जगभरातील सुमारे 20 लाख स्मार्ट टीव्ही, अँड्रॉईड टीव्ही बॉक्स आणि इतर इंटरनेटशी जोडलेल्या उपकरणांमध्ये मालवेअर घुसवून त्यांचा वापर सायबर गुन्हेगार प्रॉक्सी नेटवर्क म्हणून करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या उपकरणांच्या मालकांना त्याची पुसटशी कल्पनाही नव्हती.
सायबर तज्ञांच्या मते, अशा संक्रमित उपकरणांचा वापर बनावट इंटरनेट ट्रफिक निर्माण करणे, विविध संकेतस्थळांवर हल्ले करणे, ऑनलाइन फसवणूक लपविणे किंवा संशयास्पद व्यवहारांसाठी केला जातो. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा वैयक्तिक डेटा चोरीला गेला नाही तरी त्याचे उपकरण सायबर गुह्यांचे साधन बनू शकते. स्वस्त आणि अनधिकृत अँड्रॉईड टीव्ही बॉक्स, कालबाह्य सॉफ्टवेअर तसेच सुरक्षा अद्ययावत (Security Updates) न केलेली उपकरणे अधिक धोक्यात असल्याचे तज्ञांचे मत आहे.
सायबर सुरक्षा तज्ञांच्या मते, इंटरनेटशी जोडलेले कोणतेही उपकरण आता ‘सेट अँड फरगेट’ राहिलेले नाही. अनेक वापरकर्ते एकदा स्मार्ट टीव्ही बसवल्यानंतर त्याचे सॉफ्टवेअर कधीच अद्ययावत करत नाहीत. याच निष्काळजीपणाचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात. जुन्या सुरक्षा त्रुटींचा वापर करून ते उपकरणांमध्ये मालवेअर घुसवतात आणि त्यांचा वापर विविध ऑनलाइन गुह्यांसाठी करतात. त्यामुळे स्मार्ट टीव्हीच्याही नियमित सुरक्षा अद्ययावत (Security Updates) तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
म्हणूनच स्मार्ट टीव्ही किंवा टीव्ही बॉक्स नेहमी अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावा. नियमित सॉफ्टवेअर अपडेट्स करावेत, संशयास्पद अॅप्स इन्स्टॉल करणे टाळावे आणि गरज नसताना अज्ञात स्रोतांमधून कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये. अन्यथा हीच उपकरणे सायबर गुन्हेगारांसाठी सहज प्रवेशद्वार ठरू शकतात. इंटरनेटशी जोडलेले प्रत्येक उपकरण हे आता केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नसून ते आपल्या डिजिटल सुरक्षेचाही महत्त्वाचा भाग बनले आहे.



























































