
संघातील अंतर्गत वाद आणि गेल्या काही दिवसांपासून बॅटमधून धावा न निघाल्याने हिटमॅन रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट जवळ आल्याची चर्चा रंगू लागली आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणारा तिसरा एकदिवसीय सामन्यानंतर रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. रोहितने यापूर्वीच कसोटी आणि टी-20 मधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर रोहित 2027च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र, लॉर्ड्सवरील आगामी एकदिवसीय सामना रोहितच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर रोहितने 2027 मध्ये विश्वचषक जिंकण्यासाठी चंग बांधला होता. हा टप्पा गाठण्यासाठी रोहित गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेत आहे. फिटनेस चांगला राहावी यासाठी रोहितने तब्बल 11 किलो वजनही कमी केले होते. फिटनेस आणि फॉर्मच्या बाबतीत त्याला नेहमीच विराट कोहलीपेक्षा एक पाऊल मागे मानले जात होते, परंतु या परिवर्तनाने 2027 च्या विश्वचषकात खेळण्याची त्याची आशा जिवंत ठेवली. मात्र सध्याच्या चर्चांनुसार रोहितची मेहनत पाण्यात जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वाद चव्हाट्यावर
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे रोहित आणि विराटसोबतचे संबंध कधीच सलोख्याचे नव्हते. जेव्हा विराट कोहलीने आरसीबीच्या एका पॉडकास्टमध्ये संघ व्यवस्थापनाच्या रणनीतीवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तेव्हा हा दुरावा अधिकच वाढला.
































































