
अयोध्येतील राम मंदिर आणि बद्रीनाथ मंदिरातील देणगी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिरात देणगी मोजणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मंदिर परिसरातील दुकानदारांनाही देणगीपेट्या उघडणे आणि त्यातील रकमेची मोजणी करताना निरीक्षक म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली जाणार आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे.
श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानचे सचिव कपिल शर्मा म्हणाले की, “देणगी मोजणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी स्वतंत्र निरीक्षकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांपेक्षा यासाठी अधिक योग्य व्यवस्था असू शकत नाही.”
मंदिरातील देणगीपेट्यांची मोजणी ‘रेड झोन’ म्हणून घोषित करण्यात आलेल्या अतिसुरक्षित भागात केली जाते. मंदिर परिसरात सुमारे 30 दुकाने असून, सर्व दुकानदारांची पोलिसांकडून पडताळणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना रेड झोनमध्ये प्रवेश देण्यासाठी अतिरिक्त परवानग्या किंवा सुरक्षा प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज भासणार नाही, असे शर्मा यांनी सांगितले.
तसेच बाहेरील व्यक्तींना निरीक्षक म्हणून सहभागी करून घेतल्यास अनेक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे मंदिर परिसरातील पडताळणी झालेल्या दुकानदारांचा समावेश करणे अधिक सोयीचे ठरणार आहे, असेही शर्मा यांनी यावेळी सांगितले. या नव्या व्यवस्थेनुसार दर महिन्याला देणगी मोजणीच्या वेळी एक किंवा दोन दुकानदार निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील.
याशिवाय, देणगी मोजणीची संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड केली जाणार असून, हे फुटेज सहा महिन्यांपर्यंत जतन केले जाईल. मंदिर प्रशासन सध्या सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन सीसीटीव्ही कॅमेरेही बसवत असल्याची माहिती कपिल शर्मा यांनी दिली.
अयोध्येतील राम मंदिर आणि बद्रीनाथ मंदिरातील कथित देणगी चोरीच्या आरोपांनंतर मंदिरांमधील देणगी व्यवस्थापनाची पारदर्शकता वाढवण्याबाबत चर्चा सुरू झाली असून, त्याच पार्श्वभूमीवर मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.




























































