
तमिळ सुपरस्टार आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या अभिनय कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट ‘जन नायकन’ प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 23 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या बहुचर्चित पॉलिटिकल अॅक्शन ड्रामाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 15 कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली आहे. त्यामुळेच आता हा चित्रपट 2026 मधील सर्वाधिक प्री-सेल करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 21 जुलै सकाळी 11 वाजेपर्यंत देशभरातील 5 हजार 751 शोसाठी 4.29 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली होती. ब्लॉक सीट्स वगळता चित्रपटाने 10.45 कोटी रुपयांची, तर ब्लॉक सीट्ससह 15.18 कोटी रुपयांची ग्रॉस अॅडव्हान्स बुकिंग नोंदवली आहे. या दमदार प्री-सेलमुळे ‘माना शंकरा वारा प्रसाद गारू’ या चित्रपटाचा अॅडव्हान्स बुकिंगचा विक्रम मागे पडला आहे. 2026 मधील सर्वाधिक पहिल्या दिवसाच्या प्री-सेलमध्ये ‘धुरंधर 2’ (53 कोटी), ‘पेद्दी’ (20.66 कोटी) आणि ‘द राजासाब’ (15.31 कोटी) यांच्या पाठोपाठ ‘जन नायकन’ (15.18 कोटी) चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.
सध्याचा ट्रेंड पाहता, ‘जन नायकन’ हिंदुस्थानात पहिल्या दिवशी 50 ते 60 कोटी रुपयांची कमाई करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अंतिम क्षणी तिकीटविक्रीला आणखी वेग मिळाल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा चित्रपट रजनीकांतच्या ‘कुली’ ने जगभरात पहिल्या दिवशी केलेल्या, 151 कोटी रुपयांच्या विक्रमाला आव्हान देऊ शकतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘जन नायकन’मध्ये विजय यांच्यासोबत पूजा हेगडे, बॉबी देओल, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज, प्रियामणी, नारायण आणि नासर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.





























































