दिल्लीतील दडपशाही आणि विद्यार्थ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत शिवतीर्थावर 24 जुलैला आंदोलन; सर्वजण तिरंग्याखाली एकत्र येऊया, आदित्य ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर राजधानी दिल्लीत अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेचे पडसाद देशभरत उमटत आहेत. विद्यार्थ्यांवरील सरकारच्या या दडपशाही विरोधात एकजुटीन आवाज उठण्यासाठी २४ जुलै रोजी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शांतता पूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दुपारी ४ वाजल्यापासून आपण सर्वजण तिरंग्याखाली एकत्र येऊया आणि सायंकाळी ५ वाजता आपले राष्ट्रगीत गाऊया, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांना तिरंग्याखाली एकजूट होण्याचे आवाहन केले आहे.

दिल्लीतील अमानुष दडपशाही आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ हे शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. देशासाठी लढणाऱ्या धाडसी तरुणांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, हे दाखवून देणे हा यामगचा उद्देश आहे. जर तुम्ही जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक, अभिजीत दीपके आणि इतर आंदोलनकर्त्या तरुणांच्या पाठीशी असाल तर, नक्की या. तसेच, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर खासदारांना आंदोलन करताना ज्या प्रकारे ताब्यात घेण्यात आले, त्या हुकूमशाहीच्या विरोधात असाल तरी नक्की या. जर हे त्यांच्यासोबत घडू शकते तर, उद्या तुमच्यासोबतही नक्कीच घडू शकते. त्या आंदोलनातील महिला आणि पुरुषांवर ज्या प्रकारे क्रूर बळाचा वापर करण्यात आला, त्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात असाल तर नक्की या. हे सर्व देशप्रेमींचे शांततापूर्ण आंदोलन आहे. जागृत झालेल्या देशासाठी, हातात तिरंगा घेऊन एकत्र येऊन राष्ट्रगीत गाण्यासाठी, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

देशभक्ती आणि देशावरचे प्रेम म्हणजेचं, जे अयोग्य आहे त्याविरोधात प्रश्न विचारणं… सत्ताधारी देशाची सेवा करण्यात वा प्रशासन चालवण्यात अपयशी ठरतात तेव्हा त्यांना त्याबद्दल जबाबदार धरणं! सर्व नागरिक, सर्व राजकीय पक्ष आणि विचारसरणीच्या लोकांनी (कोणत्याही पक्षीय झेंड्याशिवाय) आणि आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल असावे, चांगले असावे; असे ज्यांना ज्यांना वाटते अशा सर्वांना आमचे आग्रहाचे निमंत्रण आहे. सर्व विचारसरणीच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांचा एकच आवाज. नक्की या!, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.