सामना प्रभाव! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डंपरवर पोलिसांची कारवाई सुरू, पकडलेल्या डंपरवर पोलीसच चिकटवतायत रेडियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महामार्गावर अनेकवेळा नंबर प्लेट नसलेले डंपर, डंपरच्या मागील बाजूस रेडियम न लावलेले आणि टेल लॅम्प नसलेले डंपर उभे असतात. रात्री अंधारात या डंपरचा अंदाज न आल्यामुळे अनेकवेळा भीषण अपघात घडतात ही बातमी दैनिक सामनाने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डंपरवर कारवाई सुरू केली आहे. पोलीस फक्त कारवाई करून थांबले नाहीत तर स्वखर्चातून डंपरना रेडियम चिकटवण्याचे काम पोलिसांनी केले आहे.

पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात मिशन टेप फॉर सेफ आणि अपघात प्रतिबंध ही नवी मोहिम हाती घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डंपर व अन्य वाहनांवर कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे दिवस-रात्र भरधाव धावणारे डंपर कारवाईच्या कचाट्यात सापडले.

डंपरवर कारवाई करत असताना रत्नागिरी पोलिसांनी सामाजिक हेतूने स्वखर्चातून डंपरना रेडियम लावले आहे. ज्या डंपरच्या मागील भागात रेडियम नाही त्या डंपरवर पोलीस तात्काळ रेडियम लावत आहेत. पोलिसांच्या या मोहिमेने डंपर चालकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम पोलीस करीत आहेत.