
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज प्रचंड गदारोळ झाला. पेपरफुटीवर चर्चेची तयारी सरकारने दाखवली; मात्र ‘आधी राजीनामा घ्या, नंतर चर्चा करा’ अशी ठाम भूमिका विरोधकांनी घेतली. ती मान्य न झाल्याने गोंधळ वाढत गेला.
‘नीट’ (NEET) पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी घेऊन सरकारने धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपदावरून हाकलून द्यावे, अशी मागणी होत आहे. त्यासाठी जंतरमंतरवर ‘जेन-झी’ तरुण आंदोलनाला बसले आहेत. देशभरातून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलिसी अत्याचारामुळे आंदोलन अधिकच भडकले आहे. याची धग आज संसदेतही जाणवली.
राज्यसभेत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सर्व कामकाज स्थगित करून यावर चर्चेची मागणी केली, तर लोकसभेत काँग्रेसचे खासदार हिबी एडन यांनी स्थगन प्रस्ताव मांडत विद्यार्थ्यांवरील अत्याचारावर चर्चेची मागणी केली. तृणमूल काँग्रेसनेही त्यास पाठिंबा दिला. या मागणीला सत्ताधाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत व नंतर दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
दुपारी २ वाजता कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी चर्चेची तयारी दाखवली; मात्र लोकसभेत काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल आणि राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सरकारने ती मान्य न केल्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्या गोंधळात सायंकाळी साडेचार वाजता दोन्ही सभागृहे तहकूब करण्यात आली.
-
वेळ पडल्यास सर्व मराठे दिल्लीत येतील – जरांगे
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज जंतरमंतरवर जाऊन अभिजीत दीपके यांची भेट घेतली व तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. “जंतरमंतर सोडू नका, वेळ पडल्यास सर्व मराठे दिल्लीत येतील,” असे जरांगे यांनी सांगितले.
-
अण्णांचे आज मौन:
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे उद्या, गुरुवारी अहिल्यानगर शहरात मौन धरणे आंदोलन करणार आहेत.
-
विरोधी खासदारांची काळ्या कपड्यांत निदर्शने:
विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काळे कपडे परिधान करून निदर्शने केली.



























































