मोखाड्यात बांधकाम खाते दोन वर्षांपासून कुंभकर्णी झोपेत, देवबांध घाटात विद्यार्थी, प्रवाशांची नाकाबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांधकाम खात्याच्या कुंभकर्णी झोपेचा मोखाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांसह प्रवाशांना फटका बसला आहे. देवबांध घाटातील ब्रिटिशकालीन अरुंद पुलावर ट्रक बंद पडल्याने एसटीसह अवजड वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला तर विद्यार्थ्यांना शाळा बुडवून घरीच राहावे लागले. महत्त्वाचे म्हणजे या पुलाच्या बाजूलाच पर्यायी बांधण्यात येत असलेला पूल अर्धवट स्थितीत असून या पुलाचे काम वेळीच पूर्ण केले असते तर ही वेळच आली नसती, असा संताप व्यक्त होत आहे.

मोखाडा, खोडाळा, विहिगाव हा राज्यमार्ग मोखाडा तालुका मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गाला तसेच मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर देवबांध घाटात रस्ता अरुंद आहे. त्याच ठिकाणी एक ब्रिटिशकालीन अरुंद पूल आहे. त्याला पर्याय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजूलाच पुलाचे बांधकाम केले आहे. मात्र सदरचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून अपूर्ण स्थितीत आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीस खुला केलेला नाही.

अरुंद पुलाच्या वळणावरच रात्री एका ट्रकचा एक्सल तुटल्याने तो ट्रक तिथेच नादुरुस्त झाला. त्यामुळे संपूर्ण वाहतूक बंद झाली. परिणामी लहान, हलक्या वाहनांनी लगतच्या अर्धवट पुलावरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र येथून एसटी जात नसल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुन्हा घरी परतावे लागले.

घाटातील अरुंद पूल मोठा करण्याचे काम सुरू आहे. या अरुंद पुलावर ट्रक फेल झाल्याने दुसऱ्या बाजूने लहान वाहनांची वाहतूक सुरू केली आहे. हा ट्रक जेसीबीच्या साह्याने बाजूला करून लवकरच मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात येईल.
> – विशाल अहिरराव, उपअभियंता, बांधकाम उपविभाग, मोखाडा.