भंगार विक्रीतून मध्य रेल्वेची कोट्यवधींची कमाई, पहिल्या तिमाहीत कमावले 136.10 कोटी रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोट्यवधींची कमाई केली आहे. पहिल्या तिमाहीत भंगार विक्रीतून 136.10 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. गेल्या पाच वर्षांतील पहिल्या तिमाहीतील ही सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. मध्य रेल्वेने पाचही विभागांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये ‘मिशन – झिरो स्क्रॅप स्टेटस’ राबवत भंगार साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या केंद्रित प्रयत्नांमुळे विक्रीच्या कामगिरीत लक्षणीय वाढ झाली आहे.

एप्रिल ते जून 2026 या कालावधीत मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून 136.10 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील भंगार विक्रीच्या उत्पन्नाच्या तुलनेत यात 89 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे.

मुंबई विभागाने सर्वाधिक कामगिरी करत 22.43 कोटी रुपयांची भंगार विक्री केली आहे. त्यानंतर भुसावळ विभाग (20.44 कोटी रुपये), नागपूर विभाग (19.98 कोटी रुपये), पुणे विभाग (18.19 कोटी रुपये) आणि सोलापूर विभाग (6.44 कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो. परळ आणि माटुंगा कार्यशाळा तसेच मध्य रेल्वेवरील इतर ठिकाणचे शेड्स/युनिट्स यांनी एकत्रितपणे भंगार विक्रीतून 48.62 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.