
अस्वच्छता आणि खाद्यपदार्थांचा दर्जा राखला जात नसल्यामुळे अखेर मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅण्टीनला अन्न व औषध नागरी पुरवठा प्राधिकरणाने (एफडीए) गुरुवारी सील ठोकले. तसेच कॅण्टीनचा परवाना निलंबित केला.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील नव्या इमारतीच्या तळमजल्यावर कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी कॅण्टीन चालवण्यात येते. या कॅण्टीनचा ठेका कमल कॅटर्सला देण्यात आला आहे. याआधी कॅण्टीनमधील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या.
खाद्यपदार्थांवरील माशा आणि अस्वच्छतेबाबत ग्राहकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. मात्र या तक्रारींकडे कॅण्टीन चालकाने दुर्लक्ष केले होते. दोन दिवसांपूर्वी एफडीएने कॅण्टीनवर धाड टाकली व खाद्यपदार्थांची पाहणी केली होती. यात खाद्यपदार्थाचा दर्जा योग्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे गुरुवारी सकाळी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कॅण्टीनला सील ठोकले. तर त्यांचा परवाना काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांचे खाण्याचे वांदे
पालिका मुख्यालयातील कॅण्टीनमध्ये बाहेरील हॉटेलच्या तुलनेत कमी दरात खाद्यपदार्थ मिळत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अधिकारी-कर्मचाऱ्यांची गर्दी असे. अगदी आझाद मैदानात बंदोबस्ताला उपस्थित असलेले पोलीसही याच कॅण्टीनमध्ये येऊन नाश्ता व जेवण करत होते. बहुतांशी नगरसेवकही कॅण्टीनमध्ये येतात. परंतु ही कॅण्टीन बंद झाल्यामुळे आता सर्वांच्याच खाण्याचे वांदे झाले आहेत.
नगरसेवकांनी केल्या तक्रारी
कॅण्टीनवर एफडीएने केलेल्या कारवाईचा मुद्दा स्थायी समितीत उपस्थित झाला. अस्वच्छता, खाद्यपदार्थांचा निकृष्ट दर्जा याबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एफडीएच्या कारवाईबाबत कामगार, अधिकाऱ्यांना काहीच माहीत नव्हते. त्याला थेट निलंबित करण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली. पालिका मुख्यालयातील कॅण्टीन एफडीएने सील करणे म्हणजे शरमेने मान खाली जाणे आहे. जे अधिकारी याची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत त्यांच्यावर सक्त कारवाई करा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.


























































