
राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशद्रोही ठरवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर तोंड लपवून पळण्याची नामुष्की ओढवली! मुरूम येथे भाजपचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या घरी पाहुणचारासाठी जात असताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या काफिल्यासमोर तुफान घोषणाबाजी केली.
अख्खी हयात काँग्रेसमध्ये घालून राजकीय आयुष्याचा वानप्रस्थ निवांत घालवण्यासाठी बसवराज पाटील हे भाजपच्या आसऱ्याला आले आहेत. भाजपमध्ये येताच बसवराज पाटलांना विधान परिषदेची बक्षिसी मिळाली. मुरूम येथे बसवराज पाटलांचे आदरातिथ्य घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे खास आले होते.
दिल्लीत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ मुरुम येथे कडक बंद पाळून चौकात आंदोलन करण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा पाचपन्नास गाड्यांचा काफिला याच वेळी धुरळा उडवित बसवराज पाटलांच्या घराकडे जात होता.
रवींद्र चव्हाणांचा काफिला पाहताच विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. मुर्दाबाद, मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी कायर है, भाजपा सरकार मुर्दाबाद, भाजपा सरकारचं करायचं काय.. खाली मुंडकं वर पाय, जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है… अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांचा संताप पाहून रवींद्र चव्हाण अक्षरशः तोंड लपवून तेथून पळाले.




























































