
‘हा देश तरुणांचा आहे. देशातील तरुण देशाचे भवितव्य आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकारने तरुणांना शिक्षणासाठी संघर्ष करायला लावला. त्यासाठी देशाला शिकलेला पंतप्रधान पाहिजे. परंतु तरुणांनी आता देश जागा केला आहे. आम्ही जेन झी आहोत. धर्मेंद्र प्रधान, तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल,’ असा इशारा पुण्यात तरुणांनी दिला.
नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँक्रोच जनता पार्टीतर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली. लाल महालावरून निघालेले जेन-झीचे हे वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. या रॅलीत तरुणांनी मोदी सरकारला हा निर्वाणीचा इशारा दिला.
“प्रधान यांचा राजीनामा ही पहिली पायरी असून, शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तन हेच आमचे अंतिम ध्येय आहे,” असा नाराही या रैलीत तरुणाईने दिला. विद्यार्थी मरत आहेत, पण या गेंड्याच्या कातडीच्या लोकप्रतिनिधींना याचे काही पडलेले नाही. गोरगरिबांच्या विद्याथ्यर्थ्यांनी शिकायचे नाही का? न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर तुम्ही लाठीचार्ज करता, आम्ही आतंकवादी आहोत का? असा सवालही तरुणांनी केला.
पुण्यात जेन-झीचे वादळ! धर्मेंद्र प्रधान, तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल; तिरंगा रॅलीत विद्यार्थ्यांची मागणी pic.twitter.com/80X9wI7K0K
— Saamana Online (@SaamanaOnline) July 25, 2026
जोरदार पावसातही हजारो तरुण-तरुणींनी हातात तिरंगा ध्वज, संविधानाच्या प्रती, छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. इन्कलाब झिंदाबाद… भारत माता की जय.., धर्मेंद्र प्रधान… राजीनामा द्या.., मोदी सरकार डरता है, पोलीस को आगे करता है… अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या मोर्चामध्ये विविध संस्था, संघटना सहभागी झाल्या होत्या.
‘अशिक्षित सत्तेवर अन् सुशिक्षित रस्त्यावर’
स्वतंत्र भारताची व्याख्या, ‘अशिक्षित सत्तेवर अन् सुशिक्षित रस्त्यावर’ अबकी बार अंतिम संस्कार.., अब इस देश को, बस नरेंद्र मोदी बचा सकते है! अपना इस्तिफा देकर… जब तक भाजपा है सरकार में तबतक देश का भविष्य है अंधःकार में… पेपर लीक करने वालों पर कारवाई करो, छात्रों पर नही… ‘पंत’प्रधान इस्तिफा दो… चाय बनाव चुतिया नहीं.., कोई आया था भारत का लाल बनकर और सह गया अडानी और अंबानी का दलाल बनकर… देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि पेपर फोडण्यात धर्मेंद्र अशा आशयांचे पोस्टर हातात घेऊन तरुणांनी केंद्र सरकारवर रोष व्यक्त केला.
मग परीक्षा का लीक प्रूफ नाहीत? चिमुकलीचा सरकारला सवाल
आंदोलनात तरुणांबरोबर अनेक चिमुकले हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. एका नऊ वर्षीय चिमुकलीने सरकारविरोधात जोरदार भाषण करत सॅनिटरी पॅड शंभर टक्के लीक प्रूफ असतात, मग परीक्षेचे पेपर का लीक प्रूफ नाहीत, असा संतप्त सवाल केला.
आम्हाला शहीद भगतसिंग यांचा मार्ग स्वीकारायला लावू नका
सरकारला मेलडी खायला वेळ आहे; पण विद्यार्थ्यांना भेटायला वेळ नाही. आज आम्ही गांधीजी, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गाने चालत आहोत. तुम्ही आम्हाला शहीद भगतसिंग यांचा मार्ग स्वीकारायला लावू नका, असा इशाराही विद्याथ्यांनी दिला. हे सरकार जनतेच्या हिताचे आहे की, जनतेच्या हत्येचे, असा सवालही मोर्चातील तरुणांनी केला.




























































