मेटाने पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ फेसबुकवरून हटवला, नेमकं काय घडलं? वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ फेसबुकवरून काही काळासाठी हटवल्याप्रकरणी मेटा या कंपनीने सरकारची माफी मागितली आहे. मात्र सरकारने मेटाचे स्पष्टीकरण असमाधानकारक ठरवत कंपनीच्या जागतिक सार्वजनिक धोरण प्रमुखांना समन्स बजावले आहे. दैनिक भास्करने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नुकताच आपला एक सेल्फी-स्टाईल व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ फेसबुकवर काही काळासाठी ब्लॉक करण्यात आला होता. युजर्सना हा व्हिडीओ पाहताना तो उपलब्ध नसल्याचा मेसेज दिसत होता. या प्रकारानंतर सरकारने याची गंभीर दखल घेत मेटाला जाब विचारला.

मेटाच्या प्रवक्त्याने नंतर एक निवेदन जारी करत दिलगिरी व्यक्त केली आणि चुकीने हा व्हिडीओ हटवला गेल्याचे मान्य केले. ऑटोमेटेड कंटेंट फिल्टरमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही चूक झाल्याचे आणि आता तो व्हिडीओ पुन्हा प्लॅटफॉर्मवर पूर्ववत करण्यात आल्याचे मेटाने सरकारला सांगितले.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने मात्र मेटाचे हे कारण अमान्य केले आहे. तांत्रिक बिघाडामुळे असे झाले असेल, तर मेटाने त्यांच्या सिस्टीम आणि तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. या प्रकरणात सखोल चर्चेची गरज असून हा मुद्दा अजूनही संपलेला नाही, असे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.