बलात्काऱ्यांचा बचाव करणाऱ्याला भाजपने शिक्षणमंत्री केले, राहुल गांधींचा प्रल्हाद जोशींवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवनियुक्त केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. २००२ च्या बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींच्या जन्मठेपेच्या शिक्षेतून मुदतपूर्व सुटका करण्याच्या निर्णयाचे समर्थन केल्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी जोशी यांना बलात्काऱ्यांचे रक्षक म्हटले आहे. संसदेच्या पायऱ्यांवर बोलताना राहुल गांधी यांनी संताप व्यक्त करत, बलात्काऱ्यांना संरक्षणाची गरज आहे, असे म्हणणाऱ्या व्यक्तीपेक्षा वाईट कोणी असू शकत नाही आणि अशा व्यक्तीला भाजपने देशाचे शिक्षणमंत्री केले आहे, अशी घणाघाती टीका केली. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राहुल गांधी म्हणाले की, मंत्रिमंडळात अनेक सक्षम लोक असताना पंतप्रधानांनी कोणाचीही निवड केली असती, पण त्यांनी अशा व्यक्तीची निवड केली जो बलात्काऱ्यांचे रक्षण करतो, ही अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक बाब आहे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रल्हाद जोशी यांनी बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेचे समर्थन करत, हा निर्णय कायदेशीर तरतुदींनुसार घेण्यात आल्याचे म्हटले होते. अलीकडेच विद्यार्थ्यांच्या वाढत्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.