आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केल्यास पुन्हा आंदोलन करणार – अभिजीत दीपके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेपरफुटीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या आणि आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जर पोलिसांनी किंवा प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष्य केले, तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिला आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दिल्लीत विद्यार्थ्यांचे पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले होते. यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी प्रशासनाकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे किंवा त्यांना ताब्यात घेण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप दीपके यांनी केला आहे.

शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा आणि विद्यार्थ्याचा लोकशाही अधिकार आहे, असे म्हणत अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. जर यापुढेही पोलिसांनी आपला बडगा उगारून आंदोलक विद्यार्थ्यांची धरपकड सुरूच ठेवली आणि त्यांना कायदेशीर कारवाईच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, तर हे दडपशाहीचे धोरण अजिबात खपवून घेतले जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आम्ही पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू आणि प्रशासनाला या अन्यायाविरोधात जाब विचारू, असे अभिजीत दीपके म्हणाले आहेत.