
अनेकदा एखाद्या धोकादायक वळणावर समोरून येणारे वाहन न दिसल्यामुळे भीषण अपघात होतात. मात्र, असे अपघात टाळता येतील, असे ‘व्हेईकल-टू-व्हेईकल’ (व्ही2व्ही) तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून पुढील काळात ते सर्व नव्या वाहनांमध्ये वापरले जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे धोक्याच्या वळणावर वाहनांकडून अलर्ट दिला जाईल. त्यामुळे आड वळणावर पलीकडून गाडी येत असल्याचे कळेल आणि वाहनचालक वेळीच अलर्ट होईल.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणांचा मसुदा जारी केला आहे. या मसुद्यावर 23 ऑगस्टपर्यंत सूचना आणि आक्षेप नोंदवता येतील.
काय आहे व्हेईकल–टू–व्हेईकल तंत्रज्ञान?
व्हेईकल-टू-व्हेईकल ही एक वायरलेस दळणवळण प्रणाली आहे. त्याद्वारे रस्त्यावर धावणारी वाहने एकमेकांशी त्यांचे स्थान, वेग, दिशा आणि ब्रेक यांसारखी माहिती शेअर करतात. यामुळे वाहने एकमेकांच्या अस्तित्वाचा आधीच अंदाज लावू शकतात.





























































