
कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला आज कर्जत स्थानकाजवळ अचानक आग लागली. बी-१ कोच-मधून धूर येऊ लागल्याने डब्यातील फायर अलार्म कार्यान्वित झाला आणि प्रवाशांची एकच पळापळ झाली. ट्रेनमध्ये आग लागली म्हणून सर्व प्रवासी सैरावैरा धावत होते. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. काही प्रवाशांनी तर जीव मुठीत घेऊन रुळावर उड्या मारल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कर्जत स्थानकाजवळील मंकी हिल परिसरात महालक्ष्मी एक्स्प्रेस येताच बी-१ कोचमध्ये आग लागली. आगीचा धूर सर्व कोचमध्ये पसरला आणि फायर अलाम कार्यान्वित झाला. अनेक प्रवासी गाढ झोपेत होते. अलार्म वाजताच जीवाच्या आकांताने मिळेल त्या दिशेने प्रवाशांनी पळ काढला. काही काळ डब्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांसह तांत्रिक दुरुस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काह मिनिटांतच बिघाड दूर करण्यात आला आणि गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
शॉर्टसर्किटचा अंदाज
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग नेमकी कशामुळे लागली? याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून गाड्या उशिराने धावत होत्या. कोचमध्ये धूर दिसल्याने काही प्रवासी घाबरले आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.




























































