
ब्राझीलच्या फुटबॉलचा जादूगार, ड्रिबलिंगचा बादशहा आणि कोटय़वधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा नेमार अखेर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाला. तब्बल 16 वर्षे पिवळ्या जर्सीसाठी रक्त, घाम आणि अश्रू वाहिल्यानंतर 34 वर्षीय नेमारने ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाला भावनिक निरोप दिला.
आपले क्लब असलेल्या सॅण्टोससाठी खेळताना कोपा सुदामेरिकानामध्ये वेनेझुएलाच्या युनिव्हर्सीदाद सेंट्रलवर 4-2 अशी मात केल्यानंतर नेमारने आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे ब्राझीलच्या फुटबॉलमधील एका सुवर्ण पर्वाचा शेवट झाला.
नुकत्याच झालेल्या फिफा वर्ल्ड कपच्या उपउपांत्यपूर्व (राऊंड ऑफ-16) फेरीत नॉर्वेकडून झालेल्या पराभवानंतर ब्राझीलचे आव्हान संपुष्टात आले आणि त्याच सामन्यात नेमारने राष्ट्रीय संघासाठी अखेरचा सामना खेळला. त्या पराभवानंतर सुरू झालेल्या चर्चांना अखेर त्याने पूर्णविराम दिला.
आज नेमारने ब्राझीलच्या राष्ट्रीय संघातील आपला प्रवास संपला असल्याचे सांगितले. या जर्सीसाठी मी माझे सर्वस्व दिले. इतिहास घडवला. असंख्य आनंदाचे क्षण अनुभवले. आता ही लढाई इथेच थांबवतोय, अशा भावनिक शब्दांत नेमारने आपल्या निर्णयाची घोषणा केली. मात्र, आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल कसलाही पश्चात्ताप नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
गोलांच्या बाबतीत ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू म्हणून नेमारने कारकीर्द संपवली. पेलेंचा 77 गोलांचा विक्रम मागे टाकत त्याने 130 सामन्यांत 80 गोल ठोकत स्वतःचे नाव इतिहासात कोरले. अनेक विश्वचषक, कोपा अमेरिका आणि ऑलिम्पिकमध्ये ब्राझीलचे प्रतिनिधित्व करत त्याने जगभरातील चाहत्यांना आपल्या जादुई खेळाने मंत्रमुग्ध केले.
नेमारची विक्रमी कारकीर्द
2009 मध्ये अवघ्या 17व्या वर्षी ब्राझीलकडून पदार्पण… सॅण्टोसमधून जगासमोर आलेला चमत्कारी मुलगा… बार्सिलोनात मेस्सी-सुआरेझसोबत सुवर्णत्रिकुट… 2013 कॉन्फेडरेशन चषक विजेता… 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्राझीलला ऐतिहासिक सुवर्णपदक… जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू म्हणून पीएसजीत विक्रमी बदली… अल-हिलालसाठीही फुटबॉलचा प्रवास… पुन्हा मायभूमीतील सॅण्टोसमध्ये पुनरागमन… ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू… तीन विश्वचषकांचा अनुभव… आणि अखेर 2026 विश्वचषकानंतर 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला भावनिक पूर्णविराम.

































































