दगडावरील हाताचे ठसे आधारशी लिंक करण्याच्या शोधासाठी चंद्रकांत पाटील यांना ‘नोबेल’ द्या! संजय राऊत यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वारंवार आपल्या वक्तव्याने चर्चेत राहणारे भाजपचे नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली आंदोलनासंदर्भात अजब विधान केले आहे. आंदोलनावेळी झालेल्या दगडफेकीतील प्रत्येक दगड पोलिसांनी गोळा केला असून त्यावरील बोटांचे ठसे आधार कार्ड’शी लिंक केले जाणार असून, त्याआधारे तपास केला जाईल,’ असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या वक्तव्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. संजय राऊत यांनी त्यांना थेट ‘नोबेल पुरस्कार’ देण्याची शिफारस देवेंद्र फडणवीस यांनी करावी, अशी  मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटलांना जागतिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू करा 

संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे उच्च शिक्षण मंत्री आहेत. त्यांनी हे जे नवीन संशोधन केलेलं आहे, या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला शिफारस केली पाहिजे. चंद्रकांत पाटील यांना या वर्षीच विज्ञान व संशोधन क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा, तसेच त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू करता येईल का, याचा शोध घेणे गरजेचे आहे. दगडावरच्या हातांचे ठसे घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे, हा इतका मोठा शोध आत्तापर्यंत जगातील कोणीही लावला नव्हता. आधार कार्ड निर्माण करणारे नंदन निलेकणी देखील हा नवीन शोध ऐकून दोन दिवस कोमात गेले आहेत, की हे आपल्याला का नाही समजले, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.

पक्षातील दगडधोंड्यांचा हा परिणाम

चंद्रकांत पाटलांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, छातीवर दगड ठेवून आणि रस्त्यावरचे दगड घेऊन… असे विधान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांसारख्या ज्ञानी महापुरुषाचा दगडाशी फारच जुना संबंध आहे. त्यांना विज्ञानाचा नोबेल पुरस्कार देणे गरजेचे आहे, अन्यथा देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चिमटा घेतला आहे.