ठसा – सुनील आनंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< दिलीप ठाकूर
[email protected]

ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी चित्रपटसृष्टीत ‘कलाकार पुत्र’ (स्टार सन्स) यांच्या आलेल्या प्रवाहात राजेंद्रकुमार (कुमार गौरव), सुनील दत्त (संजय दत्त), धर्मेंद्र (सनी देओल), नूतन (मोहनीश बहेल) वगैरेंच्या पाठोपाठच देव आनंदचा मुलगा सुनील आनंद याचं रुपेरी पडद्यावर येणे अगदी वेगळे होते. देव आनंद हे वेगळेच रसायन. प्रफुल्लित व्यक्तिमत्त्व व त्याचं चालणं, बोलणं, पाहणं, मान हलवणे, ऐकणं, गाणं खुलवणे या सगळ्यात ‘देव आनंद विशिष्ट शैली’ ठासून भरलेली. एक रुपेरी प्रतिमा आकाराला आलेली. त्याच प्रतिमेची साधी सर कोणालाही न येणारी. ती सुनील आनंदलाही न येणारी आणि नेमका येथेच त्याचं रुपेरी पडद्यावरील पदार्पण अडखळले. देव आनंदने आपल्या दिग्दर्शनातील ‘आनंद और आनंद’ (1984) या चित्रपटातून आपल्या या पुत्राला रुपेरी पडद्यावर आणले, पण नेहमीप्रमाणे भाव देव आनंद खाऊन गेला. सुनील आनंदचे नवखेपण जाणवलेच, पण तो देव आनंदचा मुलगा म्हटल्यावर जे चैतन्य, उल्हास जाणवायला हवा ते अजिबात दिसले नाही. हा चित्रपट अपयशी ठरला. मुंबईत नॉव्हेल्टी चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित करताना खुद्द देव आनंदने चित्रपटगृहावरील या चित्रपटाच्या पोस्टर डेकोरेशनची खास काळजी घेतली होती. या चित्रपटात नताशा सिन्हा सुनील आनंदची नायिका होती, पण तिने हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अन्य चित्रपटांत भूमिका स्वीकारून आश्चर्याचा धक्का दिला होता. या चित्रपटात देव आनंद, राज बब्बर, स्मिता पाटील यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटातील ‘मै आवारा ही सही, वादो की शाम आयी’ ही सुनील आनंदवरील गाणी लोकप्रिय झाली इतकेच.

आपल्या पुत्राचा पहिला चित्रपट अपयशी ठरला म्हणून देव आनंद निराश झाला नाही. त्याने त्याच आठवड्यात आपला अतिशय आवडत्या अशा वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओत ‘मै तेरे लिये’ या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आयोजन केले. या मुहूर्ताला चेतन आनंद, देव आनंद आणि विजय आनंद असे तिघेही आनंद बंधू सुनील आनंदला आशीर्वाद द्यायला अतिशय उत्साहाने हजर होते. विजय आनंद दिग्दर्शित हा चित्रपट निर्मितीवस्थेत खूपच रखडला. या चित्रपटाची नायिका मीनाक्षी शेषाद्री अन्य चित्रपटांत अतिशय कार्यरत झाल्याने तिच्या तारखा मिळणे अवघड होत गेले आणि तो प्रदर्शित होईपर्यंत सुनील आनंदवर अपयशी चेहरा असा शिक्का बसला होता. विजय आनंदचाही या चित्रपटातील रस संपला होता. चित्रपटसृष्टीला यशाची भाषा समजते. ती नसेल तर सगळे गणित अवघडते. तोपर्यंत सुनील आनंदचे ‘कार थीफ’ वगैरे चित्रपट प्रदर्शित झाले, पण यश प्राप्त झाले नाही. सुनील आनंद निराश झाला नाही. काही झाले तरी तो देव आनंदचा मुलगा होता. त्याने ‘मास्टर’ या नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यात भूमिकाही केली. मुंबईत अलंकार चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला असता बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिसच्या वतीने मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना तेथील पहिल्या दिवशीची पहिल्या खेळाची तिकिटे दिली होती. चित्रपटाच्या मध्यंतरला बाहेर येताच पाहतो तर समोर साक्षात सुनील आनंद आम्हा चित्रपट समीक्षकांना भेटायला आल्याचे दिसले. चित्रपट कसा वाटतोय हे त्याला जाणून घ्यायचे होते. ही देव आनंद शैली. देव आनंद राजकमल कलामंदिर स्टुडिओतील मिनी थिएटरमधील आपल्या चित्रपटाच्या खेळाला असाच येत असे.

‘मास्टर’ अपयशी ठरला यात आश्चर्य नाही. त्याने हार न मानता ‘व्हॅगेटॉर मिक्सर’ या नावाचा चित्रपट बनवायला सुरुवात केली, पण तो चित्रपट पडद्यावर आला नाही. त्याने हॉन्गकॉन्गला जाऊन विंग चुन या मार्शल आर्टसचे प्रशिक्षण घेतले असल्याने तो कराटे चॅम्पियन होता. फार पूर्वी त्याने अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे जाऊन व्यापार व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले असल्याने कालांतराने त्याने आपल्या कुटुंबाच्या सांताक्रूझच्या खिरा नगर येथील नवकेतन फिल्म, खारचे केतनव डबिंग थिएटर, पाली हिलवरील आनंद रेकार्डिंग स्टुडिओ (आता त्याजागी भव्य इमारत उभी आहे) याचे व्यवस्थापन पाहिले. त्याचा जन्म विदेशात झाला. देव आनंद आणि कल्पना कार्तिक हे पती-पत्नी 1956 साली स्वित्झर्लंड येथील झुरिच येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्लोवी वेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास गेले असता सुनील आनंदचा जन्म झाला. आज त्याची आई कल्पना कार्तिक (वय 94) आणि बहीण देविका हे उटी येथे वास्तव्यास आहेत. एक योगायोग असा, देव आनंदची 3 डिसेंबर 2011 रोजी लंडन येथील ज्या इस्पितळात प्राणज्योत मालवली, त्याच इस्पितळात सुनील आनंदने 26 जुलै रोजी अखेरचा श्वास घेतला.

‘आनंद और आनंद’ असादेखील.