
स्पेन देशावर मोठे संकट ओढावले आहे. 24 तासांमध्ये स्पेनमध्ये मोरोक्कोमधून समुद्र आणि सीमामार्गे 50 हजार स्थलांतरितांनी सीमा ओलांडून घुसखोरी केल्याने सैन्याला गोळीबार करावा लागला आहे. या गोळीबारात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हजारो स्थलांतरितांनी स्पेनच्या उत्तर आफ्रिकेतील सेउटा या प्रदेशात प्रवेश केला. 2021 नंतर स्पेन सर्वात मोठे स्थलांतरितांचे संकट झेलत आहे.
स्वतःच्या देशातील अनिश्चित परिस्थितीतून सुटका व्हावी, यासाठी अनेकजण स्पेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. युरोपमध्ये प्रवेशाचा मार्ग स्पेनमधून जातो. उत्तर आफ्रिकेतील सेउटा आणि मेलिला ही दोन शहरे युरोपियन युनियन आणि आफ्रिकेशी जोडलेली आहेत. युरोपमध्ये जाण्यासाठी ही दोन शहरे महत्त्वाची ठरत आहेत. अनेक स्थलांतरित मोरोक्कोच्या फ्निदेक किंवा बेल्योनेच या शहरांमधून पोहत पोहत सेउटामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असून काही जण जमिनीवरील सीमा ओलांडण्याची जोखीम पत्करत आहेत.





























































