Kulgam Terror Attack – दोन कामगारांच्या हत्येप्रकरणी राहुल गांधींकडून तीव्र निषेध, कठोर कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू आणि कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित मजुरांच्या हत्येप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. हा हल्ला अत्यंत दुःखद असल्याचे सांगत त्यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

जम्मू-कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम गावात शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी विटभट्टीवर काम करणाऱ्या छत्तीसगडमधील दोन कामगारांवर गोळीबार केला. यात ते कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. जखमींपैकी एक असलेल्या दीपकचा शुक्रवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. दुसरा जखमी कामगार बोपिंदर याला चांगल्या उपचारांसाठी श्रीनगरमधील शेर-ए-कश्मीर वैद्यकीय विज्ञान संस्थेत हलवण्यात आले होते, तिथे शनिवारी सकाळी त्याचे निधन झाले.

या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर लिहिले की, “जम्मू आणि कश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन हिंदुस्थानी कामगारांची हत्या होणे, हे अत्यंत दुःखद आहे. मी शोकाकुल कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो. या भ्याड हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा दिली पाहिजे. देश दहशतवादाविरोधात नेहमीच एकजूट आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.