
पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरील वाढती गर्दी आणि ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सरकते जिने (एस्केलेटर) व लिफ्टची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच विविध उपनगरीय स्थानकांवर १८ नवीन सरकते जिने आणि १६ लिफ्टची उभारणी करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना गर्दीच्या वेळी मोठा दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील उपलब्ध प्लॅटफॉर्म कमी पडत आहेत. दिव्यांग प्रवासी व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी लक्षात घेता सरकते जिने आणि लिफ्टची संख्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने १८ सरकते जिने आणि १६ लिफ्टची उभारणी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. सध्या सरकत्या जिन्यांसंबंधीची निविदा प्रक्रिया खुली केली असून त्यानंतर तांत्रिक मूल्यांकन केले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गर्दीच्या स्थानकांमध्ये सरकत्या जिन्यांची उभारणी करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
आपत्कालीन बटणाचा वाढता गैरवापर
सध्या रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असलेल्या सरकत्या जिन्यांचे आपत्कालीन बटण विनाकारण दाबण्याचे प्रमाण ९२ ते ९३ टक्क्यांच्या आसपास आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशिवाय केवळ खोडसाळपणा म्हणून बटण दाबले जात असल्याने जिने वारंवार बंद पडतात. याचा इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
‘आरडीएसओ’च्या निकषांचे मोठे आव्हान
सर्वच स्थानकांवर सरकते जिने उभारण्याची प्रवाशांची मागणी असली, तरी रेल्वेच्या ‘संशोधन डिझाइन आणि मानक संस्थेच्या’ (आरडीएसओ) कडक निकषांमुळे प्रशासनाची कोंडी होत आहे. प्रभादेवीसारख्या काही स्थानकांच्या बाहेर पालिकेची जागा असल्यामुळे तेथे रेल्वेच्या जागेअभावी सरकते जिने वा लिफ्ट उभारता येत नाहीत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.



























































