संगमनेरात बनावट नोटांचा पर्दाफाश; मोटारीतून 13.96 लाखांच्या नोटा जप्त एकाला अटक, दोघे फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sangamner-police-bust-fake-currency-racket-seize-14-lakh-fake-notes-car-chase-arrest

संगमनेर शहरात सकाळी भरधाव वेगाने धावणाऱया एका संशयास्पद मोटारीच्या पाठलागातून तब्बल 13 लाख 96 हजार रुपयांच्या बनावट नोटांचा साठा उघडकीस आला. याप्रकरणी मयूर किशोर सिद्धपुरा (वय 38, रा. गोविंदनगर, घटपुरी, ता. खामगाव) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याचे साथीदार उमेश कांबळे (खामगाव) व संदीप धापटवार (नाशिक) हे दोघे फरार झाले आहेत. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एमएच 56 ए 4423 क्रमांकाची मोटार भरधाव वेगाने शहरातून जात असताना तिने दुचाकीस्वाराला कट मारत वाहतूक नियमांची पायमल्ली केली. त्यानंतर नागरिकांनी मोटार रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने वेग कमी न करता मोटार सुसाट पळवली. यावेळी एका व्यक्तीला कारचा धक्का लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर काही धाडसी तरुणांनी संशयित मोटारीचा पाठलाग सुरू केला. पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर शहर पोलिसांनी मोटारीसह आरोपींना ताब्यात घेतले.

मोटारीची झडती घेतली असता, बॅगांमध्ये ठेवलेल्या नोटांच्या बंडलांचा साठा आढळला. तपासात या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. प्रत्येक बंडलात वर आणि खाली एक-एक खरी नोट ठेवून मधोमध बनावट नोटा भरून फसवणुकीचा डाव रचण्यात आला होता. 13 लाख 96 हजार रुपयांच्या बनावट नोटांचा साठा उघडकीस आला. प्राथमिक तपासानुसार गोलू शंकर गिरी (शेगाव) यांच्या सांगण्यावरून या बनावट नोटा संगमनेरमध्ये एका व्यक्तीला देण्यासाठी आरोपी असल्याचे समोर आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह बाबासाहेब सातपुते, विजय खुळे, सागर नागरे, संदीप कोंद्रे आणि सदाफळ बढे यांनी ही धडाकेबाज कारवाई केली.

दरम्यान, फरार आरोपींचा शोध सुरू असून, या बनावट नोटांच्या रॅकेटचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गोमांस वाहतुकीवर छापा; इनोव्हासह 6 लाख 71 हजारांचा माल जप्त

संगमनेर शहरात अवैध गोमांस वाहतुकीचे प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री जमजम कॉलनी परिसरात धडक कारवाई करत गोमांसाची वाहतूक करणारी इनोव्हा कार जप्त केली. या कारवाईत वाहनासह 6 लाख 70 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.