किराडपुऱ्यातील ‘लखोबा लोखंडे’ने ९ महिलांना घातला २८ लाखांचा गंडा; दुचाकीवरून चोरी, रिक्षातून प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किराडपुऱ्यातील ‘लखोबा लोखंडे’ याने नऊ महिलांना खोटे बोलून वेशांतर करत गंडविले. पोलिसांनी मोठ्या शितफीने या ‘लखोबाचा’ पर्दाफाश केला. ‘तो मी नव्हेच’ असे म्हणणाऱ्या अफताब ऊर्फ फईम अहेमद शेख (५२) लखोबाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून २८ लाख २२ हजार २८० रुपयांचे २७तोळे सोने हस्तगत केले.

रस्त्याने जाणाऱ्या एकट्या महिलेस हेरून वेगवेगळे कारण देत फसवणूक करणाऱ्या घटना वाढल्या आहे. फसवणूक करणारा आरोपी अफताब शेख हा प्रत्येक वेळेस महिलेला गंडविण्यासाठी वेशांतर करून वेगवेगळे कारण देत असल्याने पोलिसांचा तपास भरकट होता. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये पहिली फसवणूक केली होती. त्यानंतर २०२५ मध्ये क्रांतीचौक, पुंडलिकनगरात अशीच शक्कल लढवत महिलांना लुबाडले. त्यानंतर त्याने सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, मुकुंदवाडीच्या हद्दीत दोन, तर हसूल ठाण्याच्या हद्दीत जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कमलबाई सुखदेव शिंदे या महिलेला लॉट्रीचे आमिष दाखवत लुबाडले होते. या फसवणुकीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेला तपासाची सूचना दिली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलीस हवालदार योगेश नवसारे, संदीप तायडे, विजय निकम, प्रदीप दंडवते, बाळू लहरे, पोलीस अंमलदार जालिंदर गोरे, राजेश यदमळ, राहुल बंगाळे, विजय घुगे, तातेराव शिनगारे, संतोष चौरे यांच्या पथकाने तपासासाठी कंबर कसली होती.

गुन्हे शाखेने केला ९ गुन्ह्यांचा तांत्रिक तपास गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपीचे धागेदोरे लागताच शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या ८ गुन्ह्यांचा एकत्रित तपास सुरू केला. त्यात जवळपास २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर या सर्व गुन्ह्यातील आरोपी हाच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, मला आजार असल्याचे सांगून तपासाला अडथळा निर्माण करत होता. पोलिसांनी अखेर खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या अफताब फईम शेखला अटक केली. जेमतेम दहावी शिक्षण पूर्ण करणारा अफताब हा तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडे या पात्राप्रमाणे महिलांना वेगवेगळे कारण सांगत लुबाडणूक करत होता. त्यासाठी प्रत्येक गुन्ह्यात तो वेगवेगळे सोंग घेत होता. कधी पोलीस, लॉट्री तर कधी तुमच्या मुलाचा मीत्र आहे, असे म्हणून फसवणूक करत होता. त्यासाठी त्याने वेगवेगळे सोंग घेतल्याची माहिती समोर आली. गुन्हा केलेल्या भागातून वेगवेगळ्या भागात गेल्यानंतर दुचाकी उभी करून देत असे. रिक्षा बदलत घर गाठत होता. त्यानंतर दोन दिवसाने ती दुचाकी घेऊन येत होता.

गुन्ह्यासाठी नागपुरातून दुचाकी पळविली

शहरात चोरीचे गुन्हे करण्यासाठी अफताब याने थेट नागपूर येथील सक्करदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केली होती. याप्रकरणी त्याच्यावर नागपुरात गुन्हा दाखल आहे. याच दुचाकीचा वापर तो शहरातील गुन्ह्यासाठी करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली.

मुकुंदवाडीतील गुन्ह्यातून लागले धागेदोरे

मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ मे रोजी शोभा उमराव निकम यांना दुचाकी आडवी लावत आम्ही पोलीस आहोत, तपासणी करू द्या, असे म्हणून १ लाख २० हजार रुपयांचे सोने लुबाडले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या सीसीटीव्हीतील संशयित आणि हसूल ठाण्याच्या हद्दीतील संशयित एकच असल्याचे समोर आले होते. मात्र, हाच आरोपी पुंडलिकनगरातील फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार होता. त्यामुळे पोलिसांनी या गुन्हेगाराची पाळेमुळे शोधून काढण्यास सुरुवात केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला.