
मोदी सरकारला झुकवणाऱ्या हिंदुस्थानातील विद्यार्थी आंदोलनाची दखल अवघ्या जगाने घेतली आहे. जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिकात या आंदोलनावर सविस्तर लेख प्रकाशित झाला आहे. हिंदुस्थानातील मुख्य प्रवाहातील मीडियाने जे छापण्याचे धाडस दाखवले नाही ते सर्व या लेखात छापण्यात आले आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेली ‘56 इंच का छोटा बंदर… भाग नरेंदर, भाग नरेंदर’ ही जेन-झीची घोषणाही यात ठळकपणे छापण्यात आली आहे. या लेखाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
‘रिव्हॉल्ट ऑफ द कॉक्रोचेस ः हाऊ इंडियाज जेन-झी हम्बल्ड मोदी’ अर्थात ‘झुरळांचे बंड ः हिंदुस्थानातील जेन-झीनी मोदींना कसे झुकवले?’ अशा शीर्षकाचा हा लेख आहे. राजकीय विश्लेषक व ‘द टेलिग्राफ’चे स्तंभलेखक आसीम अली यांनी तो लिहिला आहे. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवू इच्छिणाऱ्या ‘क्रीप शो’ नावाच्या भयपट मालिकेतील अप्सन प्रॅट नावाच्या धनाढय़ माणसाची कथा लेखाच्या सुरुवातीला सांगण्यात आली आहे. प्रॅटच्या घरात घुसलेली झुरळ शेवटी त्याला कसे हरवतात अशी ती गोष्ट आहे. या गोष्टीची तुलना हिंदुस्थानातील जेन-झी आंदोलनाशी करून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
मोदींच्या मर्यादा उघड
झुरळांच्या आंदोलनामुळे लगेच सरकार पडणार नाही किंवा लगेचच पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम होईल असे म्हणता येणार नाही. मात्र या आंदोलनामुळे मोदींची वैयक्तिक लोकप्रियता घटल्याचे आणि त्यांच्या मर्यादा उघड झाल्याचे लेखात शेवटी नमूद करण्यात आले आहे.
लेखात काय…
गेल्या 12 वर्षांत मोदींनी हिंदुस्थानातील लोकशाही व संस्थांवर आपली पकड मजबूत केल्याचे सांगताना आंतरराष्ट्रीय संस्थांनी वेळोवेळी येथील लोकशाहीबद्दल व्यक्त केलेली मतेही लेखात छापण्यात आली आहेत. जेन-झी आंदोलनाचा जन्म कसा झाला, त्यांनी मोदींना आव्हान कसे दिले आणि शेवटी पेंद्र सरकारच्या अहंकाराची होळी कशी केली याचा सविस्तर आढावा आसीम अली यांनी घेतला आहे.



























































