
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने लंका प्रीमियर लीग (एलपीएल)मध्ये गुंतवणूक करत जाफना फ्रँचायझीचा सहमालक म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. झहीर खानने अँकर स्पोर्ट्स एबीच्या भागीदारीत जाफना फ्रँचायझीचा ताबा घेतला असून, संघाचे नाव आता ‘अँकर जाफना किंग्स’ असे करण्यात आले आहे. यापूर्वी, हिंदुस्थानी क्रिकेटमधील दिग्गज राहुल द्रविड, युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांनीही विविध टी-20 लीगमधील संघांमध्ये गुंतवणूक केली आहे. आता झहीर खानचेही या यादीत नाव जोडले गेले आहे. झहीर खान म्हणाला, ‘श्रीलंकेच्या गोलंदाजीतील नैसर्गिक प्रतिभेचे मी नेहमीच कौतुक केले आहे. श्रीलंकेत खेळताना अनेक अविस्मरणीय आठवणी मिळाल्या. आता संघमालक म्हणून श्रीलंकेच्या क्रिकेटचा भाग होण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. ‘अँकर जाफना किंग्स’सोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.’




























































