
मुंबईतील सोसायटय़ा, गाळेधारक फेरीवाल्यांनी पुढील एका महिन्यात स्वखर्चाने फुटपाथवर केलेले अतिक्रमण हटवावे अन्यथा पालिका स्वतः कारवाई करेल आणि कारवाईच्या खर्चाची वसुली संबंधितांकडून करण्यात येईल, असा सज्जड इशारा पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज दिला. त्यांनी ‘पेडिस्ट्रियन फर्स्ट’ अभियानांतर्गत पश्चिम उपनगरातील विविध फुटपाथची प्रत्यक्ष पाहणी करून हे निर्देश दिले.
पालिकेच्या सर्वच वॉर्डमध्ये जागोजागी फुटपाथवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे मुंबईकरांना चालणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना फुटपाथवरून मोकळेपणाने आणि सुरक्षितपणे चालता यावे यासाठी पालिकेने ‘पेडिस्ट्रियन फर्स्ट’ अभियान हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पश्चिम उपनगरातील ‘के पश्चिम’ आणि ‘पी दक्षिण’ विभागातील विलेपार्ले परिसरातील स्वामी विवेकानंद मार्ग, राम गणेश गडकरी मार्ग, बंडू गोरे मार्ग, गोरेगाव रेल्वे स्थानक मार्ग, शेठ श्री देवराजजी गुंदेचा चौक, गोरेगाव स्टेशनजवळील टोमॅटो गल्ली, दूध सागर मार्ग आदी परिसराची आज प्रत्यक्ष पाहणी केली. पदपथांवरील अतिक्रमण संपूर्णतः हटवून नागरिकांना सुलभ चालता यावे, यासाठी फुटपाथ उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले.
– ‘के पश्चिम’ आणि ‘पी दक्षिण’ विभागांसह संपूर्ण मुंबईतच पदपथांवर गृहनिर्माण संस्था किंवा गाळेधारकांकडून त्यांच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी रॅम्प तयार केले आहे. अनेक ठिकाणी गाळेधारक, भाजीविक्रेते, फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बेकायदेशीरपणे वाढीव बांधकाम किंवा दुकाने वाढवणे, माल फुटपाथवर लावणे, जाळ्या लावून जागा बंदिस्त करण्याचे प्रकार केले आहेत. अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघातही घडत आहेत. वातुकीवरही याचा परिणाम होतो.
असे आहे ‘पेडिस्ट्रियन फर्स्ट’ अभियान
– ‘के पश्चिम’ विभागात ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात 320 कि.मी. लांबीचे पदपथ अतिक्रमण संपूर्णतः हटवून नागरिकांना सुलभ चालण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील.
– के पश्चिम विभागातील एकूण 355 मार्गांपैकी 27 मार्ग हाती घेण्यात आले आहेत. या 27 मार्गांवरील 37.7 किलोमीटर अंतराइतके पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहेत.
स्टॉलधारकांना पर्यायी जागा
मुंबईत पदपथांवर जागोजागी असलेल्या स्टॉलचाही मुंबईकरांना चालताना त्रास होत आहे. त्यामुळे हे स्टॉल हटवण्याची कार्यवाही करावी आणि स्टॉलधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱयांना दिले. गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील बंडू गोरे मार्गावरील पदपथांवरील व्यावसायिकांचे स्थलांतर करण्याचे निर्देशही या वेळी आयुक्तांनी दिले.




























































