
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी निष्ठावान, पराक्रमी व स्वराज्यनिष्ठ मावळ्यांची फौज उभी केली. स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि विस्तारासाठी या मावळ्यांनी रक्ताचे पाणी केले, प्रसंगी प्राणांची आहुती देतानाही ते डगमगले नाहीत. अशाच चार रणझुंजार वीरांच्या पराक्रमाची प्रेरणादायी गाथा प्रताप गंगावणे लिखित ‘रणझुंजार’ या पुस्तकातून उलगडते.
प्रताप गंगावणे हे मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील लोकप्रिय लेखक आहेत. विषयाचा सखोल अभ्यास, ऐतिहासिक व सामाजिक संदर्भांची नेमकी मांडणी आणि वाचक-प्रेक्षकांच्या मनाला थेट स्पर्श करणारी शैली ही त्यांच्या लेखनाची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. ‘रणझुंजार’ हे त्यांचे पहिले पुस्तक. प्रस्तुत पुस्तकात त्यांनी जिवा महाल, वीर शिवा काशीद, तानाजी मालुसरे आणि संताजी धनगर या चार पराक्रमी मावळ्यांच्या शौर्य, त्याग, निष्ठा आणि समर्पणाचे जिवंत चित्रण केले आहे.
‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण सर्वश्रुत आहे. मात्र जिवा महाल नेमका कोण होता? तो महाराजांच्या सैन्यात कसा दाखल झाला? अफजलखान भेटीच्या वेळी मुख्य अंगरक्षक म्हणून त्याचीच निवड का झाली? ही जबाबदारी स्वीकारताना त्याच्या मनात कोणते विचार आणि भावना दाटून आल्या असतील? अशा अनेक प्रश्नांचा मागोवा घेत लेखकाने जिवा महालाचे व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर प्रभावीपणे उभे केले आहे. शिवा काशीद हा सामान्य मावळा, पण त्याची स्वामीनिष्ठा असामान्य होती. ‘एका दिवसाचा राजा होणे’ म्हणजे साक्षात मृत्यूच्या दाढेत जाणे हे माहीत असूनही तो हसत पालखीत बसला. हा प्रसंग वाचताना वाचक नकळत त्याच्या बलिदानापुढे नतमस्तक होतो.
तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचे वर्णन करताना लेखक वाचकाला थेट कोंढाण्याच्या लढाईत घेऊन जातात. मुलाच्या लग्नापेक्षा स्वराज्याचे हित मोठे मानणारा, महाराजांना दिलेला शब्द पाळण्यासाठी प्राणांची बाजी लावणारा आणि ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ असे ठामपणे म्हणणारा तानाजी वाचकांच्या मनात नव्याने उभा राहतो. या वीरांचे शौर्य आणि त्याग वाचताना आपण जणू प्रत्यक्ष साक्षीदार होतो. हीच प्रताप गंगावणे यांच्या लेखणीची ताकद आहे. ‘रणझुंजार’ केवळ ऐतिहासिक घटनांची मांडणी करत नाही, तर त्या घटनांमागील मूल्ये, प्रेरणा आणि जीवनदृष्टीही वाचकांपर्यंत पोहोचवते. संघर्षातून मार्ग काढण्याची जिद्द, संकटांशी दोन हात करण्याचे धैर्य आणि सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती या पुस्तकातून ठळकपणे समोर येते.
इतिहासप्रेमींसाठी ‘रणझुंजार’ या पुस्तकाचे वाचन निश्चितच मोलाचे ठरेल. त्याचबरोबर नव्या पिढीला स्वराज्यनिष्ठा, शौर्य, पराम आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांची ओळख करून देणारे प्रेरणादायी पुस्तक म्हणूनही ते आपले स्वतंत्र स्थान निर्माण करेल, अशी खात्री वाटते.
रणझुंजार
लेखक : प्रताप गंगावणे
प्रकाशक : साकेत प्रकाशन
पृष्ठे : 199 ह किंमत : 250/- रुपये

























































