सुदर्शन बाहेर, सरफराजची एण्ट्री; गॉल कसोटीसाठी टीम इंडियात मोठा बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी हिंदुस्थानी संघाला आणखी एक धक्का बसला आहे. युवा फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असून, त्याच्या जागी अनुभवी सरफराज खानचा हिंदुस्थानच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. ‘बीसीसीआय’ने रविवारी सायंकाळी सुदर्शनच्या जागी सरफराजची निवड जाहीर केली.

सहा कसोटी, पुन्हा संधी!

15 ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱया पहिल्या कसोटीपूर्वी सरफराज कोलंबो येथे भारतीय संघात दाखल होणार आहे. त्यानंतर संघासोबत गॉलकडे रवाना होईल. सरफराजने हिंदुस्थानसाठी आतापर्यंत केवळ सहा कसोटी सामने खेळले आहेत. त्याने अखेरची कसोटी 2024 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळली होती. आता साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे सरफराजसमोर पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात स्थान पक्के करण्याची संधी आली आहे.

सुदर्शनच्या अंगठय़ाला दुखापत

साई सुदर्शनच्या उजव्या पायाच्या अंगठय़ात स्ट्रेस रिअॅक्शन झाल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. सध्या तो बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन प्रक्रिया करत आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, वैद्यकीय पथक त्याच्या पुनर्वसनावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. श्रीलंका-ए संघाविरुद्धच्या दुसऱया अनधिकृत कसोटी सामन्यात सुदर्शनला ही दुखापत झाली होती. मात्र, त्याआधी त्याने सलग दोन शतके झळकावत दमदार फॉर्म दाखवला होता. त्यामुळे त्याची अनुपस्थिती हिंदुस्थानी संघासाठी मोठा धक्का मानली जात आहे.

टीम इंडियाची दुखापतींशी झुंज

श्रीलंका दौऱयापूर्वीच हिंदुस्थानी संघ दुखापतींच्या कचाटय़ात सापडला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा गुडघ्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर आहे. वॉशिंग्टन सुंदर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे पहिली कसोटी खेळणार नाही. याशिवाय हर्षित राणा हॅमस्ट्रिंग, नितीश कुमार रेड्डी क्वाड्रिसेप्स, तर आकाश दीप पाठीच्या दुखापतीमुळे उपलब्ध नाहीत. अनेक खेळाडूंच्या दुखापतीच्या संकटात टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेला सामोरे जावे लागणार आहे. आता सरफराज खान मिळालेली संधीचे कितपत सोने करतो याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.