मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलीवर सहाजणांचा अत्याचार, फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; दोघांना बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन सहा नराधमांनी एका १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मीरा रोडमध्ये काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वारंवार केल्या जाणाऱ्या या दुष्कृत्याने मेटाकुटीस आलेल्या या पीडितेने याबाबत तक्रार केली. याची गंभीर दखल घेत आरोपींविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या असून फरार असलेल्या अन्य चौघांचा तपास सुरू आहे.

पीडित मुलगी मीरा रोड परिसरात आईसोबत राहते. जुलै महिन्यात असिफने पीडितेचे कपडे बदलतानाचे नग्न अवस्थेतील छायाचित्र व व्हिडिओ काढले होते. हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असिफने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर असिफ याने संबंधित फोटो-व्हिडिओ त्याचे मित्र असलम खान (२६) आणि मोनू पटेल (२८) यांना पाठवला होता. या दोघांनीही धमकी देत पीडितेवर अत्याचार केले. दरम्यान शाजिद खान (१९) आणि आनस अली (२२) यांनीही पीडितेला वारंवार फोन करून फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तिला खाजगी ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले होते. रॉकी (२३) यांनीही पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ असल्याचे सांगून ते इतरांना दाखवण्याची धमकी दिली होती.

आरोपींवर पोक्सो.. तपास पथक तैनात

काशिमीरा पोलिसांनी सहा आरोपींविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासानुसार पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपींनी तिचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मोहम्मद अनस अंसारी (२२) आणि मोहम्मद साजिद खान (२१) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.