अजिंठा लेण्यांमध्ये झिरपणारे पाणी थांबवण्यासाठी बादल्या ठेवल्या; चित्रांना धोका नसल्याचे एएसआयचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
water-seepage-at-ajanta-caves-buckets-placed-asi-clarifies-paintings-safe

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या छतातून झिरपणारे पाणी गोळा करण्यासाठी बादल्या ठेवण्यात आल्याचे एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आले. त्यानंतर हिंदुस्थानच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) लेण्यांतील शिल्पांना कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असलेल्या अजिंठा लेण्यांमध्ये भगवान बुद्धांच्या जीवनावरील चित्रे आणि शिल्पे आहेत.

काही लेण्यांच्या काही भागांमध्ये पाणी झिरपत असून, गळणारे पाणी गोळा करण्यासाठी एएसआयच्या अधिकाऱ्यांनी तेथे बादल्या ठेवलेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.

एएसआयच्या उपअधीक्षक डॉ. शिल्पा जामगडे यांनी पत्रकारांना सांगितले की, मुसळधार पावसाच्या काळात ही समस्या उद्भवते.

‘अजिंठा लेणी ही दगडात कोरलेली आहेत. जोरदार पाऊस झाला की दगडांमधील पोकळ्यांमधून पाणी खाली येते. पर्यटक घसरू नयेत म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आम्हाला तेथे बादल्या ठेवाव्या लागतात. सध्या तरी यामुळे लेण्यांतील चित्रांना कोणताही धोका नाही’, असे त्या म्हणाल्या.

‘लेण्यांच्या वरच्या बाजूलाही पाणी वाहत असते. पाणी दगडांतील पोकळ्यांमध्ये जाऊ नये म्हणून त्यांची नियमित स्वच्छता केली जाते’, असेही त्यांनी सांगितले.