
NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) दुसऱ्या आंदोलनाचे संकेत दिले आहेत. “जंतर-मंतर सीझन २ लवकरच येईल,” असा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज दिला.
नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. सीजेपीने राजकीय आखाड्यात न उतरता देशात एक दबाव गट (Pressure Group) म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या सीजेपीच्या ठिकठिकाणी बैठका आणि चर्चा सुरू आहेत.
दिल्लीत आज सीजेपीच्या स्वयंसेवकांची बैठक पार पडली. या वेळी बोलताना दीपके यांनी गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “सीजेपीच्या बैठकांमध्ये अडथळे आणले जात आहेत. सीजेपीला बैठकांसाठी हॉल नाकारले जात असून हॉलमालकांवर दबाव टाकला जात आहे. आजच्या बैठकीसाठी आम्हाला कसाबसा हॉल मिळाला; परंतु हा हॉल देणाऱ्या मालकांनाही सकाळपासून फोन येत होते. ‘तुम्हाला उलटे लटकवू’ अशा धमक्याही त्यांना देण्यात आल्या.”
स्वातंत्र्यदिनापासून नवीन अभियानाची सुरुवात
गावोगावी सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके हे स्वातंत्र्यदिनापासून ‘शाळा ठीक करा’ या नवीन देशव्यापी अभियानाला सुरुवात करणार आहेत. विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी-सुविधांसाठी संघर्ष करावा लागू नये, यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत आली, तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यात आपण एक देश म्हणून अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन दीपके यांनी केले आहे.




























































